मराठा आरक्षणाबाबत आता राज्यभर वातावरण तापू लागले आहे. मनोज जरांगे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यावर आता भाजपचे संकट मोचन म्हणून ओळख असलेले भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला नुसते आरक्षण द्यायचे नाही तर मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती अभ्यास करीत आहे. अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
राज्यभरात मराठा आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. अनेक ठिकाणी सभा होत आहे. शिंदे समिती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सातत्याने संपर्कात आहे.
जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला वाढता प्रतिसाद मिळत असून सरकारमधील मंत्र्यांना गावबंधी करण्याचा इशारा काही गावातून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमचा फक्त एकच उद्देश आहे की, मराठयांना जे आरक्षण देण्यात यावे ते कायमस्वरूपी टिकणारे असावे, त्यासाठी आमचे सरकार योग्य ती पाऊले उचलण्यास कटिबध्द आहे. लवकरच त्यावरही तोडगा निघेल , अशी माहिती देखील महाजन यांनी दिली आहे.
