आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिका प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रता याचिका निकाली काढण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपण करत असल्याचा आक्षेप या याचिकांद्वारे घेण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आली आहे.
गेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केवळ शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 34 याचिका दाखल झाल्याची माहिती दिली होती. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी नवं वेळापत्रक सादर करणार आहेत.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रविवारी (29 ऑक्टोबर) दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेतली. आमदार अपात्रताप्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी म्हटलं होतं. आमदार अपात्रताप्रकरणी आज, 30 ऑक्टोबरपर्यंत नवं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे? यावर कायदेशीर सल्ला घेतला असल्याचं नार्वेकरांनी दिल्लीहून परतल्यावर सांगितलं.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ज्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.
