मराठा आरक्षणाचे आंदोलन तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांना अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नागपूरमध्ये या शिष्टमंडळाने फडणवीसांची भेट घेतली आहे. ही माहिती फडणवीस यांनी ट्वीट करून दिली आहे. “मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज माझी नागपूर येथे भेट घेतली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले तसेच आरक्षणासंदर्भात आणि इतर विषयांबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षण या विषयावर सरकार अतिशय गंभीर असून पूर्ण प्रयत्न करीत आहे, अशी खात्री ही यावेळी उपस्थित बांधवांना दिली.”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या सहा दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही. तसेच, दोन-तीन वेळा विशेष विंनतीवरून पाण्याचा घोट घेतला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तर, जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे.
