माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.
इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ ते गुरूवार दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ व इयत्ता १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
CBSE दहावी-बारावी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांची कोणतीही महत्त्वाची माहिती चुकणार नाही. मागीलवर्षी मंडळाने २९ डिसेंबर रोजी वेळापत्रक जाहीर केले होते. अशा स्थितीत यंदाही मंडळाकडून या तारखेच्या आसपास परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना संबंधित शाळांकडून ही माहिती मिळू शकेल.यापूर्वी, बोर्डाने सीबीएसई २०२४ च्या दोन्ही वर्गांच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. यंदाच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करताना बोर्डाने ही माहिती दिली. याशिवाय, बोर्डाने या परीक्षा सुमारे ५५ दिवस आयोजित केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
