आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षांनी 16 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश शिंदे गटाला दिले आहेत.
दीड तास झालेल्या आजच्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केलं नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरु झाली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांच्या एकूण 34 याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे.
आजच्या आमदार अपात्रता याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यास शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला होता. प्रत्येक आमदाराची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे होते. याला ठाकरे गटाच्या वकिलांनी विरोध करत सुनावणी लवकरात लवकर घेऊन निकाल देण्याची मागणी केली होती.
