व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे. सकाळी 11 वाजता त्यांच्या गिरगावातील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे.
घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली व्ही. पी. बेडेकर ॲण्ड सन्स या मसाले कंपनीचे संचालक ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समूहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी आपल्या धडाडीने या उद्योग समहात काळानुरूप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती. त्यांच्या निधनामुळे जुन्या – नव्या पिढ्यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने झालेला आघात सहन करण्याची बेडेकर परिवाराला शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, “लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायात उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांची अभिरुची जपतानाच त्यात काळानुरुप बदल करून अतुल बेडेकर यांनी बेडेकर ब्रँडला वेगळे स्थान निर्माण करून दिले. शंभर वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या पारंपरिक स्वरुपाच्या व्यवसायास आपल्या प्रयोगशीलतेने जागतिक ओळख निर्माण करून दिली. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणाऱ्या उद्योग समूहांपैकी असणाऱ्या बेडेकर उद्योग समूहाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. त्यांच्या निधनानं मराठी उद्योगजगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बेडेकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
1910 मध्ये विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसे किराणामालाचे दुकान सुरू केले. यात विश्वनाथ बेडेकरांनी लोणची आणि मसाले ठेवण्यास सुरुवात केली होती. यानंतर लोणची आणि मसाले यांचा खप मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता. यानंतर विश्वनाथ बेडेकरांनी त्यांच्या दुकानांच्या शाखा काढण्यास सुरुवात केली. यानंतर दादर, फोर्ट, माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांनी पाच दुकाने सुरू केली. यानंतर बेडेकरांचा वाढता उद्योग पाहात त्यांनी 1943 मध्ये व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड असे कंपनीचे नामकरण करण्यात आले.
