सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीच्या दूरदृश्यप्रणाली व्दारे आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, कार्यकारी संचालक कोल्हे, उजनी धरण व्यवस्थापन प्रकल्पाचे मोरे, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता बागडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जलसंपदा विभागाने रब्बी हंगाम 2023-24 व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी प्रकल्पातून दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पासून पाणी सोडणेबाबत नियोजन केले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वीज खंडित करावी जेणेकरून शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहोचेल असेही त्यांनी सांगितले.
तसेच हे पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन माहे फेब्रुवारी 2024 अखेर पर्यंत चे असून त्यानंतरचे पाणी नियोजन कशा पद्धतीने करावयाचे याबाबत जानेवारी अखेरपर्यंत कालवा समितीची पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
