सोलापूरात ड्रग्ज कारखान्यानंतर आता गोदामवर धाड; कोट्यवधींचा माल जप्त, नाशिक पोलिसांची कारवाई

नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात रोजच नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत असून नाशिक पोलिसांनी पुन्हा महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. आठ दिवसांपूर्वी सोलापूर औद्योगिक वसाहतीत छापा टाकून एमडी निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला होता. आता पुन्हा नाशिक पोलिसांनी त्याच परिसरात दुसऱ्यांदा छापा टाकला असून कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल असलेले गोदाम नष्ट करण्यात आले आहे.

सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापूरमध्ये सुरू केलेला ‘एमडी’चा कारखाना नाशिक अमली पदार्थविरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाने २७ ऑक्टोबर रोजी उद्ध्वस्त केला. तेथून दहा कोटी रुपयांच्या ‘एमडी’सह कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात नाशिकचा मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याने सनीच्या सांगण्यावरून वीस हजार रुपये दरमहा नफ्याकरिता कारखान्याचा कायदेशीर करार केला होत. काळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २) वैद्यनाथ वावळ याला अटक करण्यात आली. वावळने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेची संयुक्त पथके सोलापुरात दाखल झाली. त्यांनी शुक्रवारी (दि. ३) सोलापुरातल्या गोदामात धाड टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला.

पुणे पोलिसांनी ललित पानपाटीलच्या ड्रग्ज तस्कर टोळीला एमडी प्रकरणात ‘मोक्का’ कायदा लावला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनीही सनी पगारे, पिवाल गँगवर माेक्का लावण्याची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत सामनगाव एमडी प्रकरणात दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सनी व सुमित हे पगारेबंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे, मनोहर काळे आणि वैद्यनाथ वावळ यांचा समावेश आहे. तर वडाळा गाव प्रकरणात वसीम रफिक शेख, नसरीन ऊर्फ छोटी भाभी, इम्तियाज शेख, सलमान अहमद फलके आणि शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजीज मेमन यांना अटक केली. या पंधरा संशयितांना ‘मोक्का’ लावण्यात येणार आहे.