उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचे मेल करणाऱ्याला अटक

उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला तेलंगणामधून अटक केली आहे. आरोपीनं मुकेश अंबानींना तब्बल 5 ईमेल करत धमकी दिली होती. तसेच, आधी 20, नंतर 200 आणि त्यानंतर 400 कोटी रुपयांची मागणीही आरोपीनं केली होती. गणेश वानपारधी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

27 ऑक्टोबर रोजी धमकीचा ईमेल आल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारीने पोलिसांमध्ये तक्रार दिली. गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मात्र आरोपी सतत धमकीचा ईमेल पाठवत आहे. आता त्याने चौथ्यांदा ई-मेल पाठवला आहे. पोलिसाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेत थेट तेलंगना गाठले. अंबानी यांना धमकावणाऱ्याला तेलंगनातून अटक करण्यात आली आहे. गणेश वानपारधी असं त्यांचं नाव आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना आणखी एक धमकीचा ईमेल आला होता. त्यांच्याकडून 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. खंडणीची मागणी करणारे मेल सातत्याने येत आहेत.

यापूर्वी सुद्धा अनेकदा अंबानी कुटुंबांना असे धमकी कॉल्स आणि ईमेल आलेत. एक वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर डॉ डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

मुकेश अंबानी यांना सध्या Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही सुरक्षा व्यवस्था देशातच नाही तर परदेशात पण उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुरक्षेचा खर्च अंबानी कुटुंबिय करतात. त्यासाठी 20-30 लाखांच्या घरात खर्च करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय त्यांची खासगी सुरक्षा व्यवस्था पण आहे.