राज्यातील 17 शहरांना वायू प्रदूषणाचा धोका असून खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या 17 शहरांमध्ये कोल्हापूरसह सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, जळगाव, जालना, अकोला, लातूर, बदलापूर, उल्हासनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, चंद्रपूर यांचा समावेश आहे.
हा धोका लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य विभागांना आणि महापालिकांना, प्रदूषणादरम्यान लोकांनी कोणती खबरदारी घ्यायची, याबाबत उपाययोजना करण्याची सूचना जारी केली आहे. शिवाय आरोग्य विभागाला वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषणाच्या काळात दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहनही लोकांना करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांचे वातावरण बिघडले आहे. याबाबत आरोग्य विभागाने आपले सर्व जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयांचे शल्यचिकित्सक आणि सर्व महापालिकांना सूचना जारी करून महत्त्वाची पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दोनशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने आता पावले उचलली आहेत. हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.हिवाळय़ामुळे वातावरणातील प्रदूषित वायू आणि धुलिकण हे हवेतच राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. या महिन्यात राज्यात विविध शहरांची हवेची गुणवत्ता खराब झालेली असून, हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पुढे गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व जिल्हे आणि महापालिकांच्या प्रशासनाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.
वायू प्रदूषणामुळे खोकला, छातीत घरघर, डोळे, नाक आणि घशात जळजळ, तीव्र श्वसन नलिकेचे आजार यासारख्या तीव्र आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच हाय रिस्क असलेल्या रुग्णांना श्वसनमार्गाची जळजळ आणि संसर्ग, दम्याचा त्रास, हृदयरोग आणि सेरेब्रोव्हस्क्युलर स्ट्रोकसारख्या आजारांची तीव्रता वाढून गंभीर परिणाम जाणवू शकतात.
