ज्यांनी मतदारांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना लोकांनी नाकारलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. तर, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले “ज्या लोकांनी मतदारांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यांना जनतेने घरी बसवलं, त्यांना घरी बसायची सवय होतीच” असा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोमणा मारला. “आमच्यावर मतदारांच प्रेम आहे, मतदारांचे विश्वास आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. आणखी काम करुन विकास करु. उद्योगधंदे आणून तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करु. विकासाला आणखी चालना देऊ” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “आधीच्या अडीच वर्षातील कामगिरी लोकांनी पाहिली, घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिलं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदारांना कौल दिला आहे. यासाठी मतदारांचे आभार मानतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीत विकासकामे आणि महाविकास आघाडीनं थांबवलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम आम्ही केलं. सर्वांगीण विकास करण्याचं धोरण आखलं. राज्यातील शेतकरी, उद्योजक, महिला, तरूण, कामगारांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं.”

मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आपपल्यापरीने लोकाभिमुख काम करण्याचा, जनतेला न्याय देण्याच काम आम्ही केलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “काहींनी फक्त आरोप, प्रत्यारोप आणि टोमणे यामध्ये वर्ष घालवलं. वर्षातला एकही दिवस टिका, टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. लोकांनी त्यांना नाकारलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांचा रोख संजय राऊत यांच्याकडे होता. जे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधत असतात.