किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ; खिचडी घोटाळ्यात ईडीने बजावले समन्स

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी. वेलरासू यांनादेखील ईडीने समन्स बजावले आहे.

किशोरी पेडणेकर यांना 8(बुधवार) नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी यावे यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेत विविध घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले होते. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. तसेच ईडीने देखील किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. “माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

किशोरी पेडणेकर या समन्सवर काय प्रतिक्रिया देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी खिचडी घोटाळ्याप्रकरणी अनेकांना ईडीने समन्स बजावले आहेत. काहींची चौकशीदेखील झालीय. त्यानंतर आता पेडणेकर यांची चौकशी होणार आहे.