सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची निवड

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते. आता या पदी शिंदे गटाच्या सरवणकरांची वर्णी लागली आहे. दरम्यान, गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार गेल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती.

सदा सरवणकर हे 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांनी तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळी नाराज झालेल्या सदा सरवणकरांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2009 ची निवडणूक लढवली होती. 2012 मध्ये सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केली. त्यानंतर 2014 मध्ये आणि त्यानंतर 2019 मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

आदेश बांदेकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात सलग १९ वर्षे ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच बांदेकर यांनी २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांना मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यात आले.मात्र त्यांचा पराभव झाला.

अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सरवणकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोलंल जात होतं. अनेक दिवसांपासून तर्कवितर्कही लावले जात होते. अशातच आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.