अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता आयएमडी ने वर्तवली होती. भारतीय हवामान विभाग ने कोकणात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी संततधार तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती बळीराजाला आहे. ऐन भात कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे.
मंगळवारी रात्री वातावरणात बदल होऊन अचानक पाऊस सुरु झाला. या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्येच अडकला आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. जिल्हयात पुन्हा पाऊसाची शक्यता आहे. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस भागात पहाटेपासून अवकाळी पाऊस तर जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका आहे.
दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे. अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वार्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.सध्या केरळ व तमिळनाडू राज्यातील पाऊस आणखी वाढला आहे. ही स्थिती पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला. दक्षिण रत्नागिरीत मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला. रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. बुधावारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने बुधवारी पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात भात कापणी राहिलेली आहे.
