मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या आश्वासनानंतर दुसऱ्यांदा उपोषण मागे घेतले आहे. मात्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये मराठा आरक्षणावरून शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी म्हटले की, ओबीसी विरुद्ध मराठा मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी आता शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई माध्यमांशी बोलत होते. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत किंवा कोणी कोणाच्या अंगावरही गेले नाही. अत्यंत खेळीमेळीत चर्चा झाली. मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर काही वक्तव्य माझ्याकडून आणि काही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आली. पण यापुढे विसंगती करणारी वक्तव्य करु नये असे फक्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे आणि घडलेले आहे तेच बोला, सगळ्यांची भूमिका एकच आहे यासंदर्भात चर्चा झाली, असे स्पष्टीकरण मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले संजय राऊतांचे खबरी त्यांना अडचणीत आणतील, चार टर्म खासदार असे बोलतो, जे घडलं नाही ते भासवले जाते, हे आम्हाला आश्चर्य वाटते, पण त्यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांनी खासदार राऊत यांच्यावर टीका केली.मंत्रिमंडळातील सर्व मंत्री जबाबदार आहेत आणि निश्चितच अशाप्रकारचं काही घडलं नाही, अशी स्पष्ट भूमिका शंभुराज देसाई यांनी मांडली.
