पराभवाचा राग संसदेत काढू नका, आता तरी सुधरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

चार राज्यांच्या निकालानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला बंपर यश मिळाले. त्याचे परिणाम संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिसणार आहे. भाजप अधिक आक्रमक होणार असून विरोधकांना दोन पावले मागे घ्यावे लागणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. पराभवानंतर निराश होऊ नका. संसदेत त्याचा राग काढू नका. हा पराभव सुर्वणसंधी समजा. सकारात्मक होऊन बदल करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र यांनी दिला आहे.

विरोधकांच्या पराभवावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकीत ज्यांच्या पराभव झाला आहे, त्यांनी संसदेत त्यांचा राग दाखवू नका. पंतप्रधानांनी पुढे म्हटलं की, लोकशाहीमध्ये पक्ष आणि विपक्ष समान आहे. राजकारणात जनतेचं हित विसरू नका. हा निवडणुकीचा निकाल सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर आणा, असं आवाहन पंतप्रधानांनी राजकीय विश्लेषकाना केलं आहे.

”देशातील वातावरणात हळूहळू थंडी वाढत असली तरी राजकीय वातावरण मात्र तापले आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उत्साह दाखवणारे आणि देशाचे भविष्य निश्चित करणारे आहेत. चांगल्या जनादेशानंतर आम्ही संसदेच्या मंदिरात भेटत आहोत. मी सर्व खासदारांना सकारात्मक विचार घेऊन संसदेत यावे, असे आवाहन करतो. बाहेरच्या पराभवाचा राग संसदेत आणू नका. लोकशाहीच्या मंदिराला स्टेज बनवू नका. देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या,” असा मोलाचा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या सदस्यांना दिला आहे.

देशाने नकारात्मकता नाकारली आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आम्ही सतत विरोधकांबरोबर चर्चा करण्याची तयारी ठेवता. या अधिवेशानापूर्वी विरोधकांशी चर्चा आमच्याकडून करण्यात आली आहे. आम्हाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. लोकशाहीचे हे मंदिर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे. विकसित भारतासाठी हा महत्वाचा मंच आहे. खासदारांनी चांगला अभ्यास करुन विधेयकावर चर्चा करावी. परंतु चर्चाच झाली नाही तर देशाचे नुकसान होते.असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.