दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ सुत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये सध्या सत्तेत असलेलं एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार विशेष तुकडी (एसआयटी) स्थापन करुन चौकशी करणार आहे. या एसआयटी चौकशीमध्ये आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी काम करणार आहे.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या एसआयटी चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘एयू’ नावाने सेव्ह केलेल्या क्रमांकावरुन 44 फोन कॉल आले होते. ‘एयू’ चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे, असा आहे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत मुद्दा उपस्थित चौकशीची मागणी केली होती.
