राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
आज हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. आधिवेशनामध्ये नवाब मलिकही सहभागी झाले असून ते सत्ताधारी बाकावर बसले आहेत. नवाब मलिक अजित पवार गटाच्या आमदारांच्या मागे बाकावर बसलेले दिसून आले.
दरम्यान पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यांनी तटस्थ भुमिका जाहीर केली होती. त्यानंतर मलिक बेलवरती बाहेर आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. तर काही दिवसांपुर्वी ते अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनासाठी पोहचलेल्या मलिक यांनी सत्ताधारी बाकांच्या शेवटी बसणे पसंद केले. असे असलं तरीही मलिक यांनी अधिकृत भूमिका मात्र अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे जेवढी चर्चा अधिवेशनाची सुरु आहे, तेवढीच चर्चा नवाब मलिक यांच्या भूमिकेची देखील आहे.
