‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकर लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी नव्या चित्रपटाची खास मेजवाणी घेऊन येणार आहे. प्रसाद खांडेकरांचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
पण प्रसाद खांडेकरचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तो एका संकटामध्ये आला आहे. या चित्रपटासाठी त्याला थिएटर मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. हाच मुद्दा आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानपरिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. आमदार प्रविण दरेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रसाद खांडेकरांच्या चित्रपटाचा मुद्दा उचलून धरला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थिएटर मिळवून देण्याचे आश्वासन दिले.हिवाळी अधिवेशनामध्ये एकदा काय झालं या चित्रपटाबद्दल बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले,”8 डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा चित्रपट रिलीज होत आहे. पण काही बॉस लोकं आहेत, जे या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळवू देत नाहीत.”
प्रवीण दरेकर यांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणीस म्हणाले, “प्रसाद खांडेकर हे गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. त्यांच्या सिनेमाला जर सिनेमागृह उपलब्ध होत नसेल, तर गरज पडल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल.”
