विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवशनला हजेरी लावली. इतकेच नाही तर सभागृहात ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत सत्ताधारी बाकांवर जाऊन बसलेय यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
अंबादास दानवे म्हणाले, “खालच्या सभागृहात एक सदस्य बसले आहेत, ज्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने अशी भूमिका घेत होते की आम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. त्यांच्याविरोधात काय गुन्हे होते, हे माहित आहे.” अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही हा प्रश्न उद्या उपस्थित करण्याची विनंती केली. परंतु, अंबादास दानवे आपल्या प्रश्नावर ठाम राहिले. यावर अंबादास दानवे म्हणाले, “एक सभासद सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आहेत. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलं की एका देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार जाहीर केले. त्यामुळे याबाबत सरकारची भूमिका काय हे कळलं पाहिजे.”
अंबादास दानवे यांच्या आक्षेपानंतर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील (नवाब मलिक) आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडत आहेत.आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजूला अजितदादा बसले आहे. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल, देशद्रोहाचा आरोप झाल्यावर देखील, आणि ते जेलमध्ये असताना सुद्धा तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढले नाही. याचे उत्तर आधी द्या त्यानंतर आम्हाला विचारा, असे फडणवीस म्हणाले.
