महाराष्ट्रात अनेक भागामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 जणांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौर्यावर येणार आहे. 13, 14 डिसेंबर दिवशी हे पथक मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांमध्ये पथक भेट देणार आहे.
तसेच पाहणी केल्यावर 15 डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल. विशेष म्हणजे, केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख असणार आहे.
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने आठही जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकराने देखील मदत करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय पथक मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यानंतर हे पथक पुण्यात एक बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला पाठवणार आहे. त्यामुळे, केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अवर सचिव के. मनोज, केंद्रीय खर्च विभागाचे सहसंचालक जगदीश साहू, नीती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, केंद्रीय पेयजल व स्वच्छता खात्याचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, केंद्रीय जलस्रोत विभागाच्या संनियंत्रण व मूल्यमापन संचालनालयाचे संचालक हरीश उंबरजे, केंद्रीय ग्रामीण खात्याच्या प्रशिक्षण विभागाचे उपसचिव प्रदीप कुमार,केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे अवर सचिव संगीत कुमार, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सहआयुक्त डॉ. एच. आर. खन्ना, कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे, पुसा येथील महालनोबिस राष्ट्रीय पीक हवामान केंद्राचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे सल्लागार चिराग भाटिया यांचा केंद्रीय पथकात समावेश आहे.
