पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा डंका; जगभरात ठरले सर्वात लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, नरेंद्र मोदी यांना तब्बल 76 टक्के रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीतील डेटाच्या आधारे जारी करण्यात आले आहे.महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे.

या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल यांना सर्वाधिक म्हणजेच 66 टक्के लोकांनी पसंती दिली. यावेळी मात्र 29 टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली आहे. याआधीच्या रेटिंगमध्ये मॅन्युएल तिसऱ्या स्थानावर होते. यंदाच्या वेळी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झालेली दिसून येतेय. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बुर्सेट 58 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दुसरीकडे अध्यक्ष जो बायडेन लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांना 37 टक्के रेटिंग मिळाली आहे. मॉर्निंग कंसल्टने 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत सर्व्हे करून डेटाच्या आधारे ही माहिती दिली आहे.कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे रेटिंग 31 टक्के आहे, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे रेटिंग 25 टक्के आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी वेगवेगळ्या देशांतील प्रौढ लोकसंख्येच्या रेटिंगच्या आधारे काढली जाते. तसेच, प्रत्येक देशातील सॅम्पल साईज वेगळी असते.मॉर्निंग कंसल्ट ही संस्था प्रत्येक आठवड्यात लोकप्रिय नेत्यांची रेटिंग जाहीर करते. या रेटिंगमध्ये मोदी सातत्याने अव्वल स्थानावर आहेत.