बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम हटवण्याची मागणी केली होती, नरेंद्र मोदींनी ते स्वप्न पूर्ण केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम हटवण्याची मागणी केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.या निकालाबाबत आज अधिवेशनात आलेल्या उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. तसंच मोदी काश्मिरी पंडितांची गॅरंटी घेणार का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. श्रेय घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाने लोकसभेत एक आणि राज्यसभेत वेगळी भुमिका घेतल्याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये निवडणुका घेतल्या तर आनंदच होईल. परंतु, त्याआधी काश्मीर सोडून गेलेल्या काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये आणण्याची गॅरंटी कोण देणार? येणाऱ्या निवडणुकांआधी ते परत येतील याची गँरंटी कोणी देईल का? पंतप्रधान मोदी तरी देतील का? कारण हल्ली गॅरंटीचा काळ आहे. ते सतत गॅरंटी-गॅरंटी म्हणत असतात.

पाकव्याप्त कश्मिर हे भारतात आले पाहिजे, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आणि मोदी हे असंभव असेल ते संभव करणारे आहेत. त्यामुळे येत्या काळाची वाट पाहा, असे उद्धव ठाकरेंना सुनावले.नरेंद्र मोदी जेव्हा हे काम करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी. इकडेही आणि तिकडेही तबलाही आणि डग्गाही अशी राहिली आहे. त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे. उद्धव ठाकरेंनी खरं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने साथ दिली आहे, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

धरावीचे टेंडर रद्द करण्याचे काम कोणी केले. विकास कामांना नेहमी विरोध करायची हीच उद्धव ठाकरेंची निती आहे. लोकांना घरं मिळू नये असं त्यांना वाटतं. उद्धव ठाकरे यांचा मूळ स्वभाव हा विरोध करणारा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.