उद्धव ठाकरेंचा लंडनमध्ये इक्बाल मिर्चीबरोबर डिनर; नितेश राणेंचा आरोप

इक्बाल मिर्चीवरुन भाजप-ठाकरे गटात जुंपली आहे. प्रफुल्ल पटेलांवर कारवाईची मागणी ठाकरे गटाने केली आहे. यावर पलटवार करताना नितेश राणेंनी मोठा दावा केला आहे. ‘उद्धव ठाकरे आणि इक्बाल मिर्ची लंडनमध्ये एकत्र जेवले’, असा दावा नितेश राणेंनी केला आहे. ‘ठाकरेंनी इक्बाल मिर्चीसोबतच्या जेवणावर बोलावं’ अशी मागणीही नितेश राणेंनी केली.

इकबाल मिर्ची हा मुंबईच्या 1993 च्या बॉम्ब हल्ल्यातील एक फरार आरोपी आहे. तसेच तो मोठा ड्रग्ज तस्कर आहे. तो युरोपातून ड्रग्ज तस्करीचं काम करतो. तो सध्या इंग्लंडमध्ये असल्याची चर्चा सातत्याने सुरु असते. तो तिथून दाऊदच्या काळ्या दुनियेतलं कामकाज पाहतो. या इकबाल मिर्चीला उद्धव ठाकरे भेटल्याचा आरोप नितेश राणे यांनी केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी फोटो समोर आणू, असा इशारा ठाकरेंना दिलाय. उद्धव ठाकरेंनी खरं सागावं, नाहीतर फोटो समोर आणू, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे लग्नाचे वय झाले आहे, वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते. संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावल्याप्रकरणी राणे म्हणाले, “घाण चपलांनीच साफ करायची असते. घाणीला हात लावायचो नसतो. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी जे केले त्याचा अभिमान आहे.” लव्ह जिहाद प्रकरणात जिहादी वृत्तीचे नेते आमच्या हिंदू भगिनींना धमकावत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादची प्रकरणे पुढे येत नाहीत. माझ्याकडे या संदर्भात पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ओरी’ आहे. तो माहिती नाही कशाला यात्रा घेऊन निघाला आहे. ‘ओरी’ला आपण किती गांभीर्याने घ्यायचे, हा प्रश्नच आहे.

नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “रोहीत पवार हे राजकारणातले ऑरी आहेत. ऑरी जसा बॉलीवूडमध्ये काय करतो नेमकं त्याचं काम काय आहे? हे कुणालाच माहीत नाहीय. तसंच रोहित पवार देखील राजकारणात सध्या काय करतात हे कोणालाच माहीत नाहीय. कधी कुठेही दिसतात, कोणासोबतही दिसतात, त्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे कळायला नको का?”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.