एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदार यांनी शिवसेनेत बंड केलं. तेव्हापासून ठाकरे गटात गळती सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह हे शिंदे गटाला दिले. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लातूरमधील माजी जिल्हाप्रमुख आणि पालघरमधील चार नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे.
लातूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह जवळपास अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.अनेक वर्षापासून शिवाजी माने हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी माने यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवून जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली होती. यामुळचे शिवाजी माने हे ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
गेल्या वर्षभरात पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गटाने पक्ष बांधणीवर भर दिला आहे.
