सर्व्हे काहीही असो, देशात फक्त मोदींचीच हवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला फायदा होणार असून महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता राज्यातल्या नेत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण कोणताही सर्व्हे असो फक्त मोदींचीच हवा असणार आहे, जनतेने ठरवलं आहे मोदींनाच निवडून द्यायचं. त्यामुळे आम्ही 40 च्या वरती जाणार म्हणजे जाणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सी व्होटरने हा सर्वेक्षण केला आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात राज्यात एनडीए आघाडीला 19-21 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेस आघाडीला 26-28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे येथे कार्यक्रमासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, राज्यात वाढत असलेल्या कोरोना केसेस कडे राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यामध्ये काळजी करण्यासारखी स्थिती नसली तरी काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतली असून योग्य त्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत. कोरोना बाबत लागणारी सर्व यंत्रणा सूचना सुसज्ज असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव फार वाढणार नाही अशी अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.