शेतकऱ्यांची चिंता वाढली; नवीन वर्षाच्या सुरुवातील अवकाळीच संकट

या वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संकटे आली. या वर्षांत पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात आणि देशातील काही भागांत झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. आता पुन्हा वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही चांगलाच गारठा वाढला आहे. एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, जोरदार ईशान्येकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली, ३० डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ पर्यंत किनारपट्टीवर तामिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ आणि २८ डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यात शीतलहर पसरली असून, अनेक जिल्ह्यांचा पारा कमालीचा घसरला आहे. राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान सोमवारी जळगावमध्ये नोंदवले गेले असून, पारा ९.६ अंशांपर्यंत घसरले होते. त्या खालोखाल गोंदिया (१०.५), चंद्रपूरच्या (११.४) तापमानात घट नोंदवली गेली. उत्तरेकडून सक्रिय शीतलहरींमुळे थंडी वाढली असून, सकाळी धुकेही दाटून येत आहे.

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान १२ अंशाखाली गपोहोचलं आहे. नागरिक गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमानात मोठी घटट झाली आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगला घसरला आहे.