आरबीआयच्या कार्यालयात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी आल्यानतंर एकच खळबळ उडाली. ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची देण्यात आली धमकी. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई मेल आला.खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब लावले आहेत.आरबीआय ने खाजगी क्षेत्रातील बँकांसह भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि काही उच्च बँकिंग अधिकारी तसेच भारताचे काही नामांकित मंत्री यांचा समावेश आहे. याप्रकरणी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि घोटाळ्याच्या संपूर्ण प्रकटीकरणासह एक प्रेस स्टेटमेंट जारी करा, अशी मागणी अज्ञातांनी ई-मेलद्वारे केली आहे.
हा ई-मेल प्राप्त होताच, आरोपींनी ज्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता त्याठिकाणी तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. पण या शोध मोहिमेत काही आक्षेपार्ह आढळलं नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु झालाय. हा ई-मेल कुणी केला, त्याचा उद्देश काय होता, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.
रिझर्व्ह बँकेला सकाळी साधारण १०.५० वाजता धमकीचा ईमेल आला, त्यानंतर इमारत रिक्त करण्यात आली होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते. बॉम्बशोधक पथक येऊन तपासणी केल्यानंतर अफवा असल्याचे निश्चित झाल्यावर कर्मचाऱ्यांना ३ वाजता इमारतीत प्रवेश देण्यात आला, अशी माहिती आरबीआयमधील एका कर्मचाऱ्याने दिली.
