देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यातच आता नाताळ सणानिमित्त सुट्टी लागल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमणावर गर्दी वाढली आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दर्शन रांगेमध्ये भाविकांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या भाविकांकडे मास्क नसले त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही, अश्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतील साई संस्थानाला दिल्या आहेत.
साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभरात असल्याने शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला सातत्याने येतात. मात्र आता कोरोनाच्या जेएन.1 या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना प्रवेशद्वाराजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिली आहे. या सूचनेची अंमलबजावणी बुधवारपासूनच केली जाणार असल्याने आता दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना तसेच ग्रामस्थांनादेखील मास्क वापरणे बंधनकारक आहे.
