मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं अमोल कोल्हेंनी अनेकदा सांगितलं; हसन मुश्रीफांचा खुलासा

खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं असं थेट आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. यानंतर अमोल कोल्हे यांनी सुद्धा आव्हान स्वीकारत अजितदादांनी माझं सुद्धा आव्हान स्वीकारावं असं प्रतिआव्हान दिलं आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील कलगीतुरा रंगला असतानाच आता अजित पवार गटाचे मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आता अमोल कोल्हें संदर्भात गौप्यस्फोट केला आहे.

‘मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही’, असं खासदार अमोल कोल्हे यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. त्याच्यामुळे माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला आहे. खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होतोय, असं ते मला अनेकदा खासगीत म्हणाले आहेत, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.तर अजित पवारांच्या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘अजित दादा कोणत्या तरी गोष्टीने नाराज झालेले असावेत असं मला वाटतं, त्यामुळेच ते म्हणाले असावेत’.

अजित पवारांनी कोल्हेंवर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले होते. तसेच अजित पवारांनी कोल्हेंना इशारा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात भेट देत तेथील विकास कामांची पाहणी केली होती. ही पाहणी करतानाच कोल्हेंना पुन्हा इशारा देत ‘मी सांगितलं तेच फायनल, विषय संपला’, असं चॅलेज दिलं. अजित पवारांनी कोल्हेंवर केलेल्या या आव्हानावर आता हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया देत “अजितदाद नाराज झालेले असावेत, त्यामुळेच ते तसं म्हणाले असावेत”, अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली.