भारत सरकारच्या प्रयत्नांना यश; भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची कतारमधील मृत्यूदंडाची शिक्षा रद्द

कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. गतवर्षी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 नौदल अधिकाऱ्यांना कोर्टाने मृत्यूदंड ठोठावला होता. कोर्टाच्या या निर्णयावर भारताने आश्चर्य व्यक्त केलं होतं. भारतीय नौदलाचे हे सर्व आठ माजी अधिकारी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून कतारमधील जेलमध्ये बंद आहे. कतारने अद्याप या सर्व माजी अधिकाऱ्यांविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिलेली नाही. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तपशीलवार निर्णयाची प्रत प्रतीक्षेत आहे. आमची कायदेशीर टीम आठ भारतीयांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात पुढील पावले उचलत आहे. सुनावणीवेळी राजदूत आणि अधिकारी न्यायालयात उपस्थित होते. आम्ही सुरुवातीपासून आठ लोकांच्या कुटुंबासोबत उभे आहोत. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता आपण त्याबद्दल फार बोलणे योग्य ठरणार नाही. आम्ही हे प्रकरण कतार प्रशासनाकडे सातत्याने मांडत आलो आहोत आणि यापुढेही करू, असेही म्हंटले आहे.

कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबरला हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. भारताने याची गांभीर्याने दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या बचावासाठी कायदेशीर उपाय सुरू केले होते. शिक्षेला आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारतर्फे गेल्या आठवड्यात देण्यात आली होती. या अपिलाचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशाही भारताकडून व्यक्त करण्यात आली.

हे सर्व अधिकारी एका खासगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतारी एमिरी नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. रिपोर्टनुसार, कंपनीचं नाव दहरा ग्लोबल टेक्नोलॉजी आणि कन्सल्टन्सीज सर्विहस आहे. कंपनी स्वतःला कतार संरक्षण, सुरक्षा आणि इतर सरकारी संस्थांचे स्थानिक भागीदार असल्याचं सांगते. रॉयल ओमान हवाई दलाचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर खामिस अल अजमी या कंपनीचे सीईओ आहेत.

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि खलाशी रागेश गोपकुमार अशी आठ माजी भारतीय नौदलाची नावे आहेत. या आठ भारतीय माजी नौसेना अधिकाऱ्यांवर काय आरोप ठेवण्यात आले, याची माहिती अद्याप सार्वजनिक केली गेलेली नसली तरी त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकांतवासात बंदिस्त केल्यामुळे हे प्रकरण सुरक्षेशी संबंधित असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.