पुण्यात मृत महिलेच्या नावावर 6 बांगलादेशी घुसखोरांचा बनावट भाडे करार; 600 बनावट पासपोर्ट जप्त

पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 604 पासपोर्ट काढल्याचे तपासात उघडकीस आलं आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी 29 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती.

ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात एकूण 20 बांगलादेशी घुसखोर आणि पुण्यातील 2 भारतीय एजंट बोरिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कडून 10 भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले. हे सर्व पासपोर्ट खोटे भाडे करारनामे जोडून पुण्यातून मिळवले असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.पासपोर्ट पुण्यातील ज्या पत्त्यावर मिळवले, तेथे हे बांगलादेशी कधीच राहात नव्हते. काही बांगलादेशी मुंबईत वास्तव्यास असूनही पुण्याचे रहिवाशी आहोत दाखविण्यासाठी एजंट मार्फत खोटे भाडे करारनामे तयार केले होते. किमान 6 बांगलादेशी घुसखोरांनी तर आपले भाडे करारनामे येरवडा येथील काही वर्षांपूर्वी मरण पावलेल्या महिलेच्या नावे करून तिच्या घरच्या पत्त्यावर पासपोर्ट मिळवले होते.

कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशींची चौकशी केली तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी 604 पासपोर्ट काढल्याचे समोर आलं आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र काढल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पारपत्र पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या पासपोर्ट कार्यालयाने झोपडीच्या भाडे करारावर भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट जारी केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात घबराटीचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या पासपोर्ट विभागाचे कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.