अजित पवारांचा सुप्रिया सुळे यांनी घेतला धसका; सर्व दौरे रद्द,पुढील दहा महिने बारामतीत तळ ठोकून बसणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना कोडींत पकडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा जागांवर अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी खुले आव्हान दिले आहे, अजित पवार यांच्या या भूमिकेचा धसका सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे. पुढील दहा महिने सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून रहाणार आहे. आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही. माझ्या कुटुंबियांना मी म्हटले आहे की, तुम्हाला आई किंवा बायको पाहायची असेल तुम्ही बारामतीत किंवा पुण्यात या, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यापासून शरद पवारांविरोधात गांभीर्याने काम सुरू केले आहे. ते ज्या भाजपा,शिवसेने बरोबर सत्तेत सामील झाले आहेत, त्या पक्षाच्या प्लॅनिंग नुसारच अजित पवारांना बारामतीत महायुतीसाठी राजकीय पेरणी करावी लागत आहे. त्यानुसार त्यांनी बारामतीत त्यांच्या नेतृत्वाची पहिली झलक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दाखवून दिली. बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाने शरद पवार गटावर मात करून दाखवली.

हा खऱ्या अर्थाने शरद पवारांच्या बारामतीतल्या राजकीय अस्तित्वाला धक्का आहे आणि यातला धोका ओळखूनच स्वतः सुप्रिया सुळेंनी बारामतीत पुढचे 10 महिने तळ ठोकून बसणार असल्याचं सांगितलं.

2 जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी बंड केलं होतं. यामुळे आता शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये वादविवाद सुरू आहे. अशातच आता लोकभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात आत्तापासूनत प्रचाराला सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. तर राज्यामध्ये 48 जागांमधून प्रत्येक पक्ष तयारीला लागला असल्याचं पाहायला मिळत आहे. या 48 सर्वाधिक चर्चेचा आणि प्रभावी मतदारसंघ म्हणजे बारामती आहे. याच मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचा मतदार उतरणार की, भाजप इतर पर्याय निवडणार अशी चर्चा सुरू आहे. अशातच दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमध्ये रणशिंग फुंकलं आहे. आपल्या परिवाराला आगामी निवडणुकीसाठी पुढील 10 महिने बारामतीत तळ ठोकून बसणार असल्याचं सांगितलं.