जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे जालनेकरांसाठी आनंदाचा व अभिमानाचा क्षण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना-मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे आजपासून सुरु झाली आहे. जालनेकरांसाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी काढले. जालना-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे ते मुंबई असा जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

अयोध्या रेल्वे स्थानकावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.या सोहळ्यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस व अंबादास दानवे यांनी सदर प्रतिपादन केले. मंचावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रेल्वेप्रमाणे आहे. महाराष्ट्रात सध्या सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहे. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी ही ट्रेन दोन वर्षात 250 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरु आहेत. यावर्षी 13 हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. अशा प्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत आहे.

जालना ते मुंबई 436.36 किलोमीटरचे अंतर सहा तास 50 मिनिटांत कापले जाईल. रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशेने ही रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमध्ये एकावेळी 530 प्रवासी क्षमता आहे, एकूण आठ डबे आहेत. जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस जालना येथून पहाटे 5.05 ला सुटेल. ती छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर येथे थांबेल. मुंबई येथे सकाळी 11.55 ला पोचेल. तर मुंबई येथून दुपारी 1.10 वाजता जालन्याकडे निघेल व जालन्यास रात्री 8.30 वाजता पोहोचेल.