मराठवाड्याला मुंबईशी जोडणाऱ्या जालना – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात आज झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एक्सप्रेसचा शुभारंभ केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत रेल्वे, मराठवाड्याचा विकास आणि अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन व बाबरी पतन या विषयांवर सविस्तर भाष्य केले.
मी एक कारसेवक म्हणून, माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो. मी 21 व्या वर्षी बदायूच्या जेलमध्ये होतो. सगळ्या प्रकारच्या आंदोलनात होतो, जिथे गोळीबार झाला तिथे मी होतो, ज्यावेळेस ढाचा तुटला तिथेही मी होतो”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर आनंद व्यक्त केला. “एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की, जो संघर्ष 500 वर्ष चालला. अनेक लढाई चालल्या, या सर्व लढायांना एकप्रकारे मंजिल मिळालं आहे. कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदी आहे”, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
बाबरी पाडली तेव्हा भाजपचीच मंडळी तिथे होती. बाकी शिवसेनेचे कोणीच नव्हते असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांनी बाबरी पाडतानाच्या आठवणी सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली. मंदीर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे असं आम्हाला हिणवलं जायचं. पण मोदींच्या नेतृत्वात आम्ही हे करुन दाखवलं, असेही ते म्हणाले.
या देशातील जनतेच्या मनातून तुम्ही राम हा शब्द काढूच शकत नाही. प्रभू श्रीराम हे आमच्या मनात, रक्तात, सगळ्याच्या डोक्यात आहेत. कितीही प्रयत्न केला तरी राम नाम आमच्या मनातून निघू शकत नाही. रामउत्सव हा आयोजित करावा लागत नाही. लोक उत्सफुर्तपणे उत्सव करतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “राम मंदिराच्या उद्घाटनाचं कुणाला निमंत्रण आहे किंवा नाही ते मला माहिती नाही. निमंत्रण येवो किंवा न येवो, राम मंदिराचं उद्घाटन होतंय. जो जो हिंदू त्याच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे”, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठवाड्याला विकासासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागायची. पण आता आमच्या सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने वेगाने कामे सुरु केली आहेत. वंदे भारत थेट मुंबईशी कनेक्ट करते. विमानाच्या वेळांच्या अनेक अडचणी येत होत्या. 2014 ते 2019 मध्ये आम्ही मराठवाड्यासाठी वेगाने कामे केली पण मधल्या काळात कामे झाली नाहीत. बुलेट ट्रेनसाठी 78 टक्के जमिन आपल्याकडे आहे. 22 टक्के जमिनीची पूर्तताही लवकरच होईल असे ते म्हणाले. कारखानदारीसाठी संभाजीनगर आणि जालना हे महत्त्वाचे जिल्हे ठरणार आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना देशाच्या आर्थिक राजधानीशी म्हणजे मुंबईशी जोडणे अत्यंत आवश्यक होते. हे केल्यामुळे आता याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
