आयकर रिटर्न भरण्यात पुन्हा रेकॉर्ड, पुढे आले 8.18 कोटी करदाते

वर्षाअखेरिस आयकर विभागानं एक नवा विक्रम केला आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार असेसमेंट ईयर 2023-24 साठी आतापर्यंत 8 कोटीहून अधिक इन्कम टॅक्स रिटर्न जमा करण्यात आले आहेत. यापूर्वी, करदात्यांनी असेसमेंट ईयर 2022-23 साठी एकूण 7,51,60,817 आयटीआर सादर केले होते. म्हणजेच, संपूर्ण गेल्या असेसमेंट ईयरमध्ये (2022-23 ) भरलेल्या आयटीआरच्या संख्येपेक्षा यंदा अधिक आयटीआर वर्ष संपण्याच्या 3 महिने आधीच दाखल झाले आहेत.

आयकर विभागाने आर्थिक वर्षातील घडामोड टिपली. त्यांनी वर्ष 2023-24 मधील आकडेवारी समोर आणली. त्यानुसार आयटीआर फाईल करण्याच्या प्रकरणात 9 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. 31 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत देशभरातून 7.51 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले. आयटीआरची संख्या वाढल्याने प्राप्तिकर विभागाला जादा काम करावे लागले. त्यांच्यावर यंदा कामाचा ताण वाढला. वर्ष 2023 मध्ये प्राप्तिकर विभागाला 1.60 कोटी ऑडिट रिपोर्ट्स आणि इतर अर्जांच्या छाननीचे काम करावे लागले. गेल्या आर्थिक वर्षात 2022 मध्ये ही संख्या 1.43 कोटी इतकी होती. आयकर विभागाने करदात्यांना सोप्या स्वरुपातील वार्षिक माहिती पत्रक आणि करदात्यांच्या माहितीचा घोषवारा सुरु केला आहे. यामुळे करदात्याला त्याच्या वर्षभराच्या कराची माहिती सोप्या पद्धतीने समोर येत आहे.

आयकर विभागाचा हा रेकॉर्ड मागील असेसमेंट ईयरच्या तुलनेत आयटीआर फाइलिंगमध्ये 6.44 टक्क्यांची वाढ दर्शवितो. गेल्या वर्षीची तुलना केल्यास, ३१ ऑक्टोबरपर्यंत आयकर विभागाकडे 7.65 कोटी आयटीआर दाखल झाले होते, जे गेल्या वर्षीच्या 7.51कोटी आयटीआरपेक्षा जास्त आहे.

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पगार, व्याज, लाभांश, वैयक्तिक माहिती, टीडीएससह कर भरणा, तोटा, एमएटी क्रेडिटसह अनेक माहिती आधीच गोळा केली गेली होती. या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. आयटीआर भरण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी, सोयीस्कर आणि जलद झाली आहे. आयटीआर भरणाऱ्यांना याचा खूप फायदा झाला आहे.सरकारने ईमेल आणि एसएमएससह अनेक रचनात्मक मोहिमा चालवल्या, सरकारच्या म्हणण्यानुसार, आयटीआर आणि इतर फॉर्म त्वरीत भरण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. सरकारने ईमेल, एसएमएस आणि इतर अनेक सर्जनशील मोहिमा चालवल्या होत्या. याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.