केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेंतर्गत 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारनेसुध्दा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6 हजार रुपये देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 97 लाख शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा केला जाणार आहे.
आज जग बदलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे. स्मार्ट प्रकल्प, स्टार्टअप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदींमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. सोबतच पेरलेल्या आणि उगविलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
