राज्यात थंडी फारशी नाही, पण पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. रिमझिम पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आहे. तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील आव्हा, तळणी, लिहा, पिंप्री गवळी या परिसरासह इतर गावात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाले आहे. मका आणि गहू तर अक्षरशः झोपला आहे. यापूर्वीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा या भागातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाताचा गेला आहे. दुसरीकडे मोठ्या आशेने रब्बी हंगामात शेतकऱ्याने लागवड केली. पिकांना रात्रंदिवस जागून खते आणि पाणी दिले. आता पीक हातातोंडाशी आलेला असताना निसर्गाने घास हिरावून घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. धुळे आणि नंदुरबार मध्ये शनिवारी आणि रविवारी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर जळगाव आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र देखील हलक्या सरी कोसळू शकतात. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान असेल. कुलाबा केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. धुक्याची चादरही पसरलेली पाहायला मिळत आहे. तर मुंबईत पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
