महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दररोज बाधितांचा आकडा हा 100 पेक्षा जास्त आढळतोय. कोरोनामुळे सध्या तरी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाहीय. पण काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. कारण कोरोनाचा संसर्ग कधी वेग पकडेल याचा अंदाज नाही. त्यामुळे आपण सतर्क राहणं जास्त आवश्यक आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य धोका लक्षात घेता नुकतंच आरोग्य विभागाचा आढावा घेतला होता. त्यानुसार शासनाचं कामकाजही सुरु आहे. पण बाधितांचा वाढता आकडा हा चिंतेला कारण ठरत आहे.
ताप, सर्दी आणि खोकला आढळल्यास कोविड चाचणी करुन घेण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून देण्यात आलाय. कोविड टास्क फोर्सची 2 जानेवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना झाल्यास गृह विलगीकरणात पाच दिवस राहावे लागेल. हवा खेळती राहिल अशा खोलीत रहावे. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरावे. घरातील ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अतिजोखिम असलेल्यांनी मास्क वापरावे. अतिजोखिम व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात यावे. अशा सूचना टास्क फोर्सकडून देण्यात आल्यात.
शुक्रवारी भारतात कोविड-19 चे 761 रुग्ण आढळले. शिवाय आकडेवारीनुसार, 12 नवीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील एक्टिव्ह कोरोना प्रकरणं 4,423 वरून 4,334 पर्यंत कमी झाली.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीसार, कोरोनाचा रिकव्हरी रेट सध्या 98.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, आतापर्यंत 220.67 कोटी कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत.
