पुढच्या 15-20 दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप; मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

लोकसभा निवडणुकांच्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.याचवेळी राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानात दुसरीकडे पडद्यामागच्या घडामोडींनी वेग पकडला आहे.तर देशपातळीवर इंडिया आघाडीसाठी खल सुरू आहे तर महाराष्ट्रात जागावाटपाचं भिजत घोंगडं मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीची धग अजून कायम असतानाच आता पुन्हा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षांमध्ये दोन राजकीय भूकंप झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यातच आता आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे. दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणाचा निकाल 10 जानेवारीपर्यंत येणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेची सुनावणीही सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जानेवारी महिन्यापर्यंत निकाल द्यावा लागणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले आहेत.

गेल्या दीड वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे. या पक्षांनंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फूट पडेल, अशी भाकीतं सातत्याने वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील एक मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात येईल, अशा चर्चा सातत्याने होत असतात. पण अशोक चव्हाण यांनी या चर्चांचं सातत्याने खंडन केलं आहे. असं असताना आता गिरीश महाजन यांनी येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप घडेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचाही गिरीश महाजनांनी समाचार घेतला आहे. प्रभू श्री राम संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. प्रभू श्री रामाच्या विरोधात बोललं की प्रसिद्धी मिळते हे आव्हाडांना माहितं आहे. म्हणून अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात आलं आहे. अशी वक्तव्य करताना आव्हाडांना लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानाबद्दल खुलासा करावा, असं आव्हान गिरीश महाजांनी दिलं आहे.