गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जूनपासून प्रवेश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध झाल्यामुळे येत्या जून 2024 पासून प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांनी केले.गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम वनविभागामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. नागरिकांना दळणवळणासाठी होणारा त्रास लक्षात घेता पूर्वी वाहतूक असलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वन विभागाकडून या मार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवानगी संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मार्कंडा तीर्थक्षेत्राच्या विकासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून या कामाला प्राधान्याने सुरुवात करण्याच्या सूचना देतांना पालकमंत्री म्हणाले की, भारतीय पुरातत्व विभाग तसेच राज्य शासनाच्या विभागांनी पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य द्यावे. गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती आधारीत उद्योग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने निर्माण करण्यासाठी कालबध्‌द कार्यक्रम तयार करावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.

गडचिरोली येथील विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध झाली असून विमान सेवेमुळे पर्यटन तसेच उद्योगांनाही चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असल्यामुळे महाराष्ट्राचा स्टिलहब होण्याची क्षमता जिल्ह्यात आहे. सुमारे 348 हेक्टर क्षेत्रामध्ये उत्खनाला मंजुरी देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात असलेली खनिज संपदा विविध उद्योगाला प्रोत्साहन ठरणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अखेर 507 कोटी 27 लक्ष रुपये इतका निधी खर्च केला असून एकूण खर्चाची टक्केवारी 99.93 आहे. या खर्चाला यावेळी मंजूरी देण्यात आली. वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत जिल्ह्यास 356 कोटी 89 लक्ष निधी प्राप्त झाला आहे त्यापैकी 285 कोटी 90 लक्ष रुपये वितरित करण्यात आले. 31 डिसेंबर अखेरपर्यंत 209 कोटी 60 लक्ष रुपये खर्च झाला आहे. एकूण 73.31 टक्के खर्च झाला आहे. उर्वरित निधी 15 फेब्रुवारी पर्यंत खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात. खर्चाच्या टक्केवारी मध्ये गडचिरोली जिल्हा दुसऱ्या स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले.