मालदीवची कोंडी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनासाठी अख्खे बॉलीवूड; इजी माय ट्रिप ट्रॅव्हल कंपनीकडून सर्व बुकिंग रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला लक्षद्वीप दौरा केला आहे. लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर लक्षद्वीप जगभरात ट्रेडिंगमध्ये आहे. लक्षद्वीपच्या सौंदर्यावर मोदींनी भाष्य केल्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी भारतासंबंधित वादग्रस्त भाष्य केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी मालदीवला बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरू केला. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी यासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे.

जॉन अब्राहमने ट्वीट करत लिहिले, अद्भुत भारतीय आतिथ्य, “अतिथि देवो भव:” हे विचार आहे. लक्षद्वीप पर्यंटनासाठी सर्वात चांगली जागा आहे. सलमान खानने मोहिमेचे समर्थन करत लिहिले, लक्षद्वीपवरील सुंदर, स्वच्छ समुद्र किनारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून खूप आनंद झाला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व आमच्या द्वीप आहे.

अक्षय कुमार याने म्हटले की मालद्वीवकडून भारतीय समुदायाविरोधात आक्षेपार्ह टीका केली गेली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मला धक्का बसला आहे आणि आश्चर्यही वाटले. आम्ही शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवतो. परंतु आपल्याला विनाकारण द्वेष सहन करावा लागत आहे. मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे. नेहमीच त्यांचे कौतुक केले आहे, परंतु आता सन्मान प्रथम आहे. चला #IndianIslands एक्सप्लोर करण्याचा आणि स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देण्याचे ठरवू या.

श्रद्धा कपूरने ट्वीट करत लिहिलं आहे,”सर्व फोटो मला लक्षद्वीपला भेट देण्यासाठी उत्सुकता वाढवणारे आहेत. खरोखरंच हा एक कमाल समुद्रकिनारा आहे. आता फक्त सुट्टीची प्रतीक्षा आहे”. मधुर भंडाकरने लिहिलं आहे,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून लक्षद्वीपच्या मनमोहक समुद्रकिनाऱ्याची झलक पाहायला मिळाली आहे. त्यांच्या या दौऱ्याने मंत्रमुग्ध केलं आहे”.

मालदीवच्या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत मालदीवमधील 8,000 हून अधिक हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. तर 2500 हून अधिक लोकांनी मालदीवला जाणाऱ्या विमानांची तिकिटे रद्द केली आहेत. मालदीवच्या बहिष्कार मोहिमेदरम्यान इजी माय ट्रिपने एक मोठे पाऊल उचलले आहे. इजी माय ट्रिपने मालदीवच्या सर्व फ्लाइटचे बुकिंग स्थगित केले आहे. इजी माय ट्रिप ही एक भारतीय ऑनलाइन प्रवासी कंपनी आहे. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या काही मंत्र्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा जबर फटका आता मालदीवच्या पर्यटनाला बसत आहे.

मालदीव सरकारने पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. मालदीवमधल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनीसुद्धा या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर युवा मंत्रालयातील मंत्री मलशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.