शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर आज इडीकडून छापा टाकण्यात आला. दहा ते बारा अधिकारी चौकशी करत असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून इडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कथीत जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीकडून ही चौकशी केली जात आहे.
मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेलं क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम झाल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या पालिकेच्या जमिनीवर बांधकाम झाल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर असलेल्या या 5 स्टार हॉटेलची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याचादावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्ट पद्धतीनं जोगेश्वरीतील खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर केला होता. तसेच, यासंदर्भातील तक्रारही सोमय्यांनी केली होती. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे पार्टनर आहेत. अलिबागमधील 19 बंगल्यांचा घोटाळाही रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरेंनी संगनमताने केला आहे. नोटंबदीतही वायकरांनी हात धुवून घेतला होता. हिशोब तर द्यावा लागणार, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं.
