आमचे सरकार आजही आहे, उद्याही राहणार; राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संत जगनाडे महाराज पुण्यातिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेमध्ये फूट पडून झालेल्या सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाहीर करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील १६ आमदारांचे राजकीय भवितव्य ठरवणारा हा निकाल आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थीर असून सरकार कालही स्थीर होते आणि उद्याही ते स्थीर राहणार आहे, असा पूर्ण विश्वास मला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला एवढीच अपेक्षा आहे की, योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय अध्यक्ष घेतील. आम्ही आणि शिवसेनेनं अतिशय कायदेशीर प्रकारचे सरकार तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे, अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल. सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील.” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.