शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत. हा निकाल सहा भागांत असणार असून एकूण ३४ याचिकांवर हा निकाल असणार आहे. राज्यातील सरकारचं भवितव्य ठरवणारा हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार असल्यामुळे त्याकडे राजकीय वर्तुळासोबतच राज्यातील समस्त जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
अशातच निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. निकालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच हा निर्णय असेल, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, हा निर्णय देताना कायद्याचं पालन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल, संविधानाच्या तरतूदी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही सूचना केलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवून निर्णय दिला जाईल, या निर्णयातून सगळ्यांना न्याय मिळेल. तसेच, या निर्णयातून दहाव्या सूचीतल्या काही बाबी आतापर्यंत स्पष्ट झालेल्या नव्हत्या, त्यातून हा निश्चितपणे अत्यंत मुलभूत आणि बेंचमार्क असा निर्णय असेल आणि या निर्णयातून कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, निकालामध्ये कायद्याच्या दहाव्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य प्रकारे वापर करण्यात येणार आहे. आजपर्यंत काही प्रोव्हिजनचं इंटरपिटीशन झालेलं नाही. अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. त्यामुळे या प्रोव्हिजन्सचा वापर केला जणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमुळे त्या कलमांचा वापर केला जाईल, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काही विशिष्ट कलमांचा वापर करुन शिंदे गटाच्या बाजूने निर्णय जाईल का? असा प्रश्न आणि तसे संकेत दिसून येत आहेत.
