उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का; ‘मशाल’ चिन्हही जाणार?

बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून ठाकरे गटाच्या सध्याच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.

निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समता पक्षाला मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा दावा समता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. ४ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे.आजपासून (११ जानेवारी २०२४) ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेत समता पक्षाने सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल हे चिन्ह काढूण घेतले जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरतं देण्यात आलं. पण या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार ?, तसेच समता पक्षाच्या दाव्यावर निवडणूक आयोग काय निर्णय देणार ? हे येणाऱ्या काही दिवसांत समोर येईल.

कालच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे.2018 ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे याबद्दल प्रश्न उपस्थित केले.उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. घटनादुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगात न केल्याचे खापर अनिल देसाई आणि सुभाष देसाईंवर फोडण्यात आलं आहे.