पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या पवित्र भूमीतून देशातील तरुणांना महत्त्वाचा आणि मोठा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही राजकारणात आला तर घराणेशाहीचा प्रभाव रोखता येईल, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जे तरुण मतदान करणार आहेत, त्यांनी तात्काळ मतदार यादीत आपली नोंदणी करून घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेतून युवा पिढीला केलं. नाशिकमध्ये आयोजित युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी तरुणांना आणि देशातील जनतेला संबोधित केलं.नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अमृतकाळच्या आजच्या तरुण पिढीवर माझा खूप विश्वास आहे. या कालखंडात देशातील अशी युवापिढी तयार होत आहे जी गुलामीच्या दबावात आणि प्रभावापासून मुक्त आहे. भारताची युवा पिढी आयुर्वेदाचे ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना विचारा. ते सांगतील, त्यांच्या काळात जेवणात बाजरीची भाकरी, कुटकी, रागी, ज्वार असायचे. पण गुलामीच्या मानसिकतेत या अन्नाला गरिबीसह जोडलं गेलं. यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढलं गेलं. हेच अन्न आता मिलेट्सच्या रुपात, सुपर फूडच्या रुपात पुन्हा स्वयंपाकघरात पोहोचत आहे. सरकारने या मिलिट्सना श्री अन्नच्या रुपाने नवी ओळख दिली आहे. आता तुम्हाला श्री अन्नचा ब्रॅण्ड अम्बेसेडर बनायचं आहे. यामुळे तुमचं आरोग्यही सुधारेल आणि देशातील शेतकऱ्यांचंही भलं होणार आहे.
आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.सहकाऱ्यांनो वेळ ही प्रत्येकाला एक संधी देते. वेळेचा हा सुवर्णक्षण आताचा अमृतकाळाचा हा कालखंड आहे. तुमच्याकडे संधी आहे, इतिहास रचण्याची, इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची. तुम्ही प्रयत्न करा, आजही आपण सर विश्वेश्वरायांच्या आठवणीत इंजिनिअर दिवस साजरा करतो. त्यांनी जे बाराव्या शतकात इंजिनिअरिंग कौशल्य दाखवलं ते आजही लाजवाब आहे.
