अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या, अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीकडून चौकशीसाठी नोटीस

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीने समन्स बजावलं आहे. येत्या 18 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहा, असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी देखील तीनवेळा केजरीवाल यांना समन्स बजावलं होतं.

अरविंद केजरीवाल यांना 18 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून देण्यात आले आहेत. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं केजरीवाल यांना पाठवलेलं हे चौथं समन्स आहे. यापूर्वी ईडीनं तीन वेळा केजरीवालांना समन्स धाडलं आहे. 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि 3 जानेवारी असे एकूण तीन समन्स ईडीकडून केजरीवालांना बजावण्यात आले होते. पण तिनही वेळी अरविंद केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत, आता चौथ्या समन्सनंतर केजरीवाल ईडीसमोर हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना तिसरे समन्स ३ जानेवारी रोजी पाठवण्यात आले होते. ईडीने नोटीस जारी करून चौकशीला हजर राहण्यास सांगितलं होतं. ईडीला दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. आतापर्यंत मिळालेले तीनही समन्सना केजरीवाल यांनी इग्नोर केलं आहे. तसंच ईडीच्या नोटीस बेकायदेशीर असल्याचं ते म्हणाले आहेत.ईडीकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसीवर अरविंद केजरीवाल यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता. ईडीचा दृष्टीकोन हा कायदा आणि समानता किंवा न्यायाच्या कसोटीवर खरा ठरू शकत नाही. ईडीचा हा हट्ट जल्लादासारखा असल्याचंही ते म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वीपासूनच आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवालांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यास सुरुवात केली होती. आप नेत्यांनी दावा केलेला की, ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धाडही टाकू शकते आणि त्यांची अटकही करु शकते. दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरुन दावा केला होता की, केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीकडून आज छापेमारी केली जाऊ शकते, तसेच, त्यानंतर त्यांना अटकही केली जाऊ शकते.