कृषी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक घटकांसाठी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.यातील बऱ्याच योजना या सूक्ष्मसिंचनाशी निगडित आहेत तर काही योजना या कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित आहेत. यामध्ये जर आपण कृषी यांत्रिकीकरणाचा विचार केला तर आता शेतीच्या प्रत्येक कामामध्ये यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत देखील विविध यंत्राकरता अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून वेळोवेळी विविध यंत्रांवरती अनुदान दिले जाते त्यामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर तसेच सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनावरती अनुदान दिले जाते तसेच आता ड्रोन पद्धतीने फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी शेती विषयक ड्रोन ला सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना ड्रोनसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज केला पाहिजे. कृषी विभागाने शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ड्रोनच्या सहाय्याने शेतीही कामे सोप्या पद्धतीने केली जातात. ड्रोनमुळे पीक, आरोग्य आणि शेतातील परिस्थिती यांबद्दल पूर्ण डेटा प्राप्त होतो, ज्याचा लाभ शेतकऱ्याला सिंचन, खते आणि कीटक नियंत्रणाविषयी निर्णय घेताना हमखास होतो. शेतकऱ्याला कमी श्रमिक खर्च येतो आणि ऑप्टिमाइझ केलेल्या संसाधनांच्या वापरामुळे ऑपरेशनल खर्च कमी येऊ शकतो. ड्रोनमुळे अचूक बियाणे लागवड आणि कीटकनाशके फवारता येतात. यामुळे वेळेचा अपव्यय होत नाही.
महाराष्ट्र राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांना ड्रोन खरेदी करायची इच्छा असेल परंतु त्यांच्या मनात एक शंका नक्की असणारच ती म्हणजे ड्रोन चा वापर कसा करावा म्हणजेच याला आपण कसं चालवू शकतो. या सर्व गोष्टींची चिंता करणे सोडून द्या कारण शासनच ड्रोन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणी करता यावी व शेतात फवारणी करताना ड्रोन कशाप्रकारे हाताळावा व याचा वापर कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती शासनाकडून देण्यात येणार आहे. याचप्रमाणे शेतात फवारणी करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे देखील प्रशिक्षण शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना शेतातील पिकांची पाहणी करता येणार असून या पाणी दरम्यान पिकांवर आलेल्या रोगाची तपासणी करण्यासाठी देखील ड्रोन फायद्याचा ठरणार आहे.पिकांवर फवारणी करण्याकरिता अगदी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या साह्याने फवारणी करता येणे शक्य होणार आहे.ड्रोनला जे काही कॅमेरे लावलेले असतात त्यांच्या मदतीने पिकांवर आलेले विविध कीड व रोगांची माहिती देखील ठेवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
विद्यापीठे व सरकारी संस्था- 100 टक्के अनुदान (10 लाखांपर्यंत), शेतकरी उत्पादक संस्था- 75 टक्के अनुदान (7 लाख 50 हजार रुपये),कृषी पदवीधारकासाठी- 5 लाखांपर्यंत अनुदान, इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा 4 लाख अनुदान मिळते.
कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंहस्ताक्षरीत प्रत
रेशन कार्ड
रहिवाशी प्रमाणपत्र
ईमेल आयडी
10 अंकी मोबाईल क्रमांक
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत
जो ड्रोन खरेदी करायचा आहे त्या ड्रोन चे कोटेशन / ड्रोन विक्रेत्याची संपूर्ण माहिती
संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व त्यांचा तपशील
अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
स्वयंघोषणापत्र
पूर्व संमतीपत्र
