विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल नार्वेकर म्हणाले मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्त्वानुसार निकाल दिला आहे. भारतातील कुठलाही नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो. याचिका गेली म्हणजे निकाल चुकीचा म्हणता येणार नाही.सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सर्वांना मुभा आहे, निकालात काय चुकीचं आहे हे न्यायालयात दाखवून द्यावं लागेल, असं सांगतानाच 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती केली ती ग्राह्य धरायची की 1999 ची ग्राह्य धरायची हा निकालातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असं नार्वेकर यांनी सांगितलं. माझे फोटो व्हिडीओ दाखवण्यापेक्षा घटना दुरुस्तीकडे लक्ष दिलं असत तर बरं झालं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, पत्रकार परिषद घेत असतील तर हा त्यांचा विषय आहे. पण त्याने काही तथ्य बदलणार नाही. मी दिलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवा, त्यानंतर पुढे बोलता येईल. पण निर्णयातील कोणतीही बाब चुकीची नाही असं सांगत फक्त टीका करणार असतील तर राज्यातील जनता सुज्ञ आहे.
राष्ट्रवादीच्या निकालवरही प्रतिक्रिया
31 जानेवारीपर्यंत हा निकाल द्यायचा आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल. उद्याच्या सुनावणी बाबत विधिमंडळ सचिवालय कळवेन, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर दिली. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे या आठवड्यात सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली.दरम्यान या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. तसेच शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान 20 ते 25 जानेवारी दरम्यान फेरसाक्ष नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.
